anekant.news@gmail.com

9960806673

राज्यात 65 टक्के उसाचे गाळप पूर्ण

पुणे ः राज्यात चालू वर्ष 2023-24 मध्ये सुमारे 920 लाख टन उसाचे गाळप अपेक्षित आहे. त्यामध्ये 21 जानेवारीअखेर 590 लाख टन म्हणजे जवळपास 65 टक्के उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर 9.39 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 55 लाख टन इतके साखरेचे उत्पादन हाती आले आहे. पुणे विभागाला ऊस गाळप आणि साखर उत्पादनात मागे टाकत आता कोल्हापूर विभागाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात सद्यःस्थितीत 97 सहकारी आणि 101 खासगी मिळून 198 साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. या कारखान्यांची दैनीक ऊस गाळपाची क्षमता 9 लाख 19 हजार 850 टन इतकी आहे. गतवर्षी याच दिवशी 205 साखर कारखान्यांनी मिळून 680 लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले होते, तर 9.61 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 65 लाख टन साखरेचे उत्पादन तयार केले होते. याचा विचार करता चालू वर्षी अद्याप ऊस गाळप आणि साखर उत्पादन कमीच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्यात यंदाच्या हंगामअखेर 920 लाख टन ऊस गळपातून सुमारे 90 लाख टन साखर उत्पादन तयार होण्याची अपेक्षा आहे. तरीसुद्धा 24 व 25 जानेवारी रोजी कारखान्यांच्या विभागनिहाय आढावा बैठका दोन दिवस आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शिल्लक उसाचे गाळपाचे चित्र आणि अपेक्षित साखर उत्पादकाची निश्‍चित स्थिती समोर येईल. - सचिन बर्‍हाटे, सहायक संचालक (विकास), साखर आयुक्तालय, पुणे (पुढारी, 23.01.2024)