पुणे ः केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर घातलेल्या निर्बंधामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. याची जाणीव केंद्र सरकारला आहे. देशाच्या साखर उत्पादनात काहीशी तूट येण्याची शक्यता असल्यामुळे हे निर्बंध घालण्यात आले आहेत. पण निर्बंध तात्पुरते आहेत. लवकरच निर्बंधापासून दिलासा देण्यात येईल, असे स्पष्ट संकेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी योनी व्हीएसआयने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये केले.
साखर कारखान्यांनी फक्त इथेनॉल उत्पादनावर थांबू नये. सीबीजी, हरित हायड्रोजन आणि हरित विमान इंधन उत्पादनाच्या दिशेने गेले पाहिजे. कारखान्यांनी कचरा, सांडपाणी, मळीसह सर्व प्रकारचा कृषी कचरा आणि शहरी कचर्यापासून इथेनॉलसह सीबीजी, हरित हायड्रोजन निर्मितीकडे वळावे, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकाने इथेनॉल उत्पादन धोरणानुसार देशात फक्त इथेनॉलचे 300 पंप सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे देशभरातील साखर कारखान्यांनी पेट्रोल डिझेल पंपाच्या बरोबरीने इथेनॉल पंप सुरू करता येतील. आसाममध्ये बांबूपासून इथेनॉलचा प्रयोग यशस्वी झाला असून, उत्पादित झालेले इथेनॉल बांगलादेशला निर्यात केले जात आहे. लवरच देशातील रस्त्यांवरून पूर्णपणे इथेनॉल आणि हरित हायड्रोजनवर चालणार्या गाड्या धावतील, असेही गडकरी म्हणाले. (लोकसत्ता, 13.01.2024)