anekant.news@gmail.com

9960806673

पुढील वर्षी मधुकरची चिमणी पेटणार!

कंपनी प्रशासनाचा निर्णय ः 4 ते 5 लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट
फैजपूर ः मधुकर सहकारी साखर कारखाना पुढील वर्षीपासून सुरू करण्याचा निर्णय मे. इंडिया बायो अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो पॅसिफिक प्रा.लि. या कंपनीने घेतला आहे. मधुकर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन 2500 मे.टन आहे, तसेच प्रतिदिवस 30 हजार लिटर रेक्टिफाइड स्पिरीट उत्पादन क्षमतेचा आसवणी प्रकल्पसुद्धा आहे.
गळीत हंगाम 2024-25 मध्ये निश्‍चित गाळप होणार आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून 4-5 लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. येत्या 2-3 वर्षात ऊस गाळप क्षमता प्रतिदिवस 3500 ते 4000 मे.टनापर्यंत वाढवण्यात येईल. प्रतिदिवस 30 हजार लिटर रेक्टिफाइड स्पिरीट उत्पादन क्षमतेचा जुना आसवणी प्रकल्पा व्यतिरिक्त नवीन प्रतिदिवस 1 लाख 50 हजार लिटर क्षमता असलेला इथेनॉल प्रकल्प उभारण्याचे कंपनीने उद्दिष्ट ठेवले आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उसाचे हेक्टी उत्पादन व साखर उतारा वाढ करण्यासाठी कार्यक्रम निरंतर राबविण्याचे कंपनीने नियोजन केले आहे. ऊस उत्पादकांनी कारखान्याच्या 100 किलोमीटर परिसरात ऊस लागवड करावी, असे आवाहनही कंपनीने केले आहे.
कंपनी चालकांनी सांगितले की, कारखान्यासाठी ऊस लागवड करणार्‍या ऊस उत्पादकांना बेण्यासाठी हेक्टरी 10 हजार रूपये व रोपांपासून ऊस लागवड करणार्‍यांना हेक्टरी 15 हजार रूपये 12 टक्के व्याजाने देण्याचा निर्णय व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे.
सतत 5 वर्षे ऊस पुरवठा करणार्‍या ऊस उत्पादकांचा ऊस कायमस्वरूपी स्वीकारला जाईल. बेणे मालकाला बेणे पुरवठा कालावधीनुसार दर 15 दिवसांनी बेणे रक्कम बँक खात्यात पाठवली जाईल. उसाची नोंदणी केल्याची पोहोच पावती ऊस उत्पादकास दिली जाणार आहे. - मे. इंडिया बायो अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो पॅसिफिक प्रायव्हेट (लोकमत, 04.01.2024)